जपानमधले अनुभव- राजेश वैद्य


जपानच्या भूमीत प्रथम पाय ठेवला तो टोकियो विमानतळावर. सातवीत असताना भूगोलात जपाननावाचा धडा होता. उगवत्या सूर्याचा देश. हिरोशिमा, नागासाकी, सुमो, त्सुनामी अनेक शब्द मनात तरंगत होते. टोकियोचा हा विमानतळ नरीता नावाच्या गावात आहे आणि गमतीदार गोष्ट म्हणजे तो रात्री १२ ते ५ बंद असतो. का?? तर लोकांची झोपमोड होते म्हणे. कहर म्हणजे या वेळेत ट्रेनसुद्धा बंद असतात. टोकियोला आणखी एक विमानतळ आहे. तो हनेदाला आहे. हा २०१० साली शहराच्या जरा जवळ बांधला. बहुतांशआंतरदेशीय विमानं इथे उतरतात. टोकियोचा विमानतळ प्रशस्त, स्वच्छ असून अतिशय कल्पकतेने सजवलाआहे. बऱ्याच ठिकाणी जपानच्या काही प्रसिद्ध जागांचे फोटो लावलेले आहेत आणि त्यावरआपले स्वागत आहे’ असे जपानी तसेच इंग्रजी भाषेत लिहीले आहेजवळपास १५ वर्षं जपान ही माझी कर्मभूमी होती. 

तुम्ही मला विचाराल की तुम्हाला जपानमध्ये सर्वांत जास्त काय आवडलं? तर मी म्हणेन माणसं......शेवटी देश देश म्हणजे कायमाणसंच की…....ह्या लोकांचं वर्णन करायचं तर रंग उजळ, मध्यम बांधा, बारीक डोळे आणि चपटे नाक. कित्येक वर्षं माझ्या मुलाला असं वाटायचं की त्याला ह्यांच्यापेक्षा जास्त दिसतं. ह्या लोकांना आपले मोठे डोळे खूप आवडतात. एक जपानी म्हण आहे, नाई मोनो नेदारी. जे आपल्यालाकडे नसतं ते आपल्याला आवडतं. निसर्गतः त्यांच्या केसाचा रंग हा काळा असतो पण पुष्कळ लोक केसांना त्यांच्या आवडीचा रंग लावतात. रंग लावणे हे काम खर्चिक पण लोकांना अतिशय प्रिय आहे. सुंदर दिसणे’ हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे अशीच त्यांची धारणा आहे.
जपान्यांचे सर्वांत भावलेले गुण म्हणजेत्यांच्या कष्टाची तयारी व वेळेचे पालन. शाळेत पहिली दोन वर्षं काहीही अभ्यास शिकवत नाहीत. या….खेळा....आणि जा....  ह्या काळात वेळेवर शाळेत जाणे, व्यवस्थित वेशभूषा करणे, कचरा न करणे, खेळून झाल्यावर खेळणी जागेवर ठेवणे, इतर मुलांबरोबर नीट वागणे, सांघिक वृत्ती इत्यादी गोष्टी नुसत्या न शिकवता त्या रक्तात भिनवल्या जातात. जपानमधे नोकरी-व्यवसायासाठी देशविदेशातून बरेच लोक येतात. त्यांच्याशी समानतेची वागणूक ही मुलांना शिकवली जाते. मुलांनी न केल्यास पालक कानउघाडणीही करताना जाणवतात. 

आपण आता सांघिक वृत्तीबद्दल बोलू. आता माझं हे वाक्य जरा नीट वाचा. "एक भारतीय माणूस हा दहा जपानी माणसांसारखा असतो पण दहा भारतीय माणसे ही एका जपानी माणसासारखी असतात."  समजलं का? आपला एक माणूस हा वाघासारखं काम करू शकतो पण दहा जण एकत्र आली कीआपल्या कामाची गुणवत्ता कमी होते. का बरं असंह्याचं कारण टीम वर्कचा अभाव. ‘मी नाही तरी दुसरं कणीतरी करेलबघेल कोणीतरी’ ह्या विचाराने आपलंच नुकसांन होतं. इथे अगदी लहानपणापासूनसांघिक वृत्ती अंगी बाणवली जाते. शिकवली जाते. वर्गातील मुलांचे छोटे छोटे गट तयार करून मग सामने खेळवले जातात. बक्षीस हे गटाला दिलं जातं. वैयक्तिक स्पर्धा नसल्यामुळे मुलांची मैत्री जास्त दृढ होते. ह्या टीम वर्कचा देशाला किती फायदा होतो ह्याचा आपणविचारसुद्धा करू शकणार नाही. कंपनी असो वा संस्था किंवा एखादी व्यवस्थासर्वत्र सांघिक वृत्तीची जपणूक आवर्जून केली जाते. अजूनही कितीतरी कार्यालयात दिवसाची सुरवात ही कवायत करून होते. एखाद्या मोठ्या खोलीत किंवा पटांगणामध्ये सगळे जण जमतात. पाच मिनीटांची कवायत करून अंगात उत्साह संचारल्यावर ही लोक एखादं गीत किंवा प्रार्थना एकत्र म्हणतात. ह्याचा शेवट "बांझाय" या घोषवाक्याने होतो. "बांझाय" चा समानअर्थी शब्द आहे "हर हर महादेव". हा सगळा प्रकार जवळजवळ १५ मिनीट चालतो पण ह्यातून जी सकारात्मक उर्जा-निर्मिती होते ती त्यांना उत्तम काम करण्यास साहाय्य करते. एखाद्या व्यक्तीलाबरं नसेल तरीसुद्धा ते कामावरजातात कारण मी जर गेलो नाही तर माझ्या सहकाऱ्यांना माझे काम करावे लागेल आणि मग त्यांना त्रास होईल’ ही भावना त्यामागे असते. इथे कार्यालयातही गणवेश घालावा लागतो. त्यातूनही एकीची भावना मनात रुजवली जाते. आणि मग कळत-नकळत आपणहीपूर्ण जीव कामात ओततो. शाळेत लावलेल्या टीम वर्कच्या छोट्याशा रोपाचा पुढे वृक्ष होतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचाप्रगतीचा आधारस्तंभ होतो.

शाळेत आणखी एक गोष्ट रक्तात भिनवली जाते ती म्हणजे वेळेचे महत्त्व. ह्याचा त्या देशाला कल्पनेपलीकडे उपयोग होतो. मी जपानमध्ये नवीन होतो तेव्हाची एक गोष्ट सांगतो. मी एका जपानी मित्राला भेटणार होतो. किती वाजता भेटायचं ? तर मी म्हटले येतो तीन-साडेतीन वाजता. तो पूर्णपणे गोंधळून गेला. मला विचारलं की तीन-साडेतीन म्हणजे नक्की किती ? तीन वाजता की साडेतीन वाजता ? आपण जसं हा अर्धा तास फुकट जाणार हे गृहीत धरतो ते तिथे होत नाही. जर कार्यालयाची वेळ सकाळी ९ ची असेल तर बरोर ९ वाजता कार्यालयातील सर्व त्या वेळी उपस्थित असतात. चहा पिण्यातगप्पा मारण्यात वेळ कधीच वाया दवडला जात नाही. हीच गोष्ट इतर ठिकाणीही लागू होते. वेळेची किंमत सांगणारं आणखी एक उदाहरण म्हणजे जपानमधील गाड्या. त्या एक मिनीटही उशीरा नसतात. जपानमधे एकपदरी लोहमार्गावरूनधिम्या, जलद आणि अतिजलद गाड्या अगदी बिनधोकपणे धावतात. अगदी बुलेट गाडीसुद्धा याला अपवाद नाही. काही ठराविक थांब्यांवरच दोन-चारपदरी रुळ असतात. हळू गाडी शेजारच्या रुळावर घेतली जाते आणि मधल्या रुळावरून जलद गाडी पुढे निघून जाते. ह्या पद्धतीत बांधकाम-खर्चात बचत होते. देशाचे अक्षरशः अब्जावधी रुपये वाचतात. 

मित्रांनोमी तर म्हणेन तुम्ही एकदातरी नक्की जपानला जा. नुसतं बघायला नका जाऊ तर अनुभवायला जा. जगायला जा.

राजेश वैद्य, मुंबई
९९६९६८२९६१


3 comments:

  1. मुलांना समजेल असा , छान झालाय लेख.

    ReplyDelete
  2. जपान आणि जपानी लोकांच्या उत्कर्षाचं रहस्यच जणू उलगडले आहे. माझ्या मुलींनाही लेख आवडला. थोरली मुलगी जपानी भाषा शिकतेय तिला तर खूपच आवडला. अभिनंदन!

    ReplyDelete