मनोगत


दिवाळी-अंक काढावा अशी कल्पना मुलीच्या मनात आली आणि आम्ही कामाला लागलो. एक निश्चित होतं की मुलांच्या लेखणीला प्राधान्य द्यायचं. त्यांच्या साहित्यनिर्मितीला कात्री लावायची नाही. मुलांचा मिळणारा प्रतिसाद पाहून छान वाटलं. भाषा व माध्यम कोणतंही असो, त्यांनी व्यक्त व्हावं, हीच मूळ इच्छा होती. परिचित-अपरिचित अशा अनेकांकडून प्रतिसाद मिळाला. हा माझा पहिलाच अनुभव होता. छापील अंक, त्याचं वितरण हे माझ्यासाठी अवघड होतं. म्हणून दिवाळी अंक छापील न काढता, आॅनलाईन उपलब्ध होईल अशा स्वरूपात काढायचं ठरवलं. ज्या दिवशी ह्या संदर्भातला निरोप पाठवत होते, त्याच वेळी वर्तमानपत्रात बातमी होती, की दिवाळीतील बाल-विशेषांक रोडावले आहेत. नियतकालिकांचीही बोटांवर मोजण्याइतकीच उदाहरणं शिल्लक राहिली आहेत. एखादा विषय घेऊन, नियमितपणे त्यावर नियतकालिक काढणे हे शिवधनुष्य आहे. 'वयम्', शिक्षण-विवेक, किशोरसारखी आजची उदाहरणं खरंच वाखाणण्याजोगी आहेत. ज्यांची लेखणी सदैव लिहिती आहे व मुलांसाठी नित्य नवं देण्याची प्रतिभा आहे, अशा सर्वांचे मनापासून आभार. नवनिर्मितीची बीजं, कल्पनाशक्तीचा विकास, नवोन्मेषशालिनी प्रतिभा फुलणं आणि निखळ आनंद हा सकस बालसाहित्याचा आत्मा आहे. बालसाहित्यात अशी निर्मिती होत राहो ही मनापासून इच्छा. धन्यवाद.









2 comments:

  1. गौरी, कन्येचा गोड हट्ट पुरवण्याचे तू मनावर घेतलेस आणि हा अंक प्रत्यक्षातही आणलास यासाठी तुझे मन:पूर्वक अभिनंदन! अंक पूर्ण वाचून पुन्हा कळवेनच.

    ReplyDelete
  2. खुप छान आहे दिवाळी अंक👌👌

    ReplyDelete